चकाचक रस्ते, भले मोठे स्टुडिओ, त्यात शांतपणे सुरू असलेले चित्रीकरण, देखणा पाटलाचा वाडा, मोठ्या शहरातील चाळ आणि बघत राहावे असे वाटणारे रेल्वे स्टेशन, अंतिम टप्प्यात आलेले दगडी मंदिर, शेजारी वसवलेले पण खरेखुरे वाटावे असे गाव.. हे वर्णन आहे कोल्हापूर चित्रनगरीचे. एकेकाळी भकास, माळरान आणि उजाड असलेला हा परिसर सुंदर लोकेशन्स आणि लाईट, कॅमेरा, ॲक्शनने बहरला आहे. राज्य शासनाने गाजावाजा न करता एखादा प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालवला तर किती चांगले काम होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून आता चित्रनगरीचा उल्लेख करावा लागेल. त्यावर आधारित मालिका आजपासून..
इंदुमती गणेशकोल्हापूर : दोन वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत भकास, ओसाड, उदास वाटणारी कोल्हापूर चित्रनगरी आता भव्य-दिव्य आणि देखण्या इमारतींनी बहरली आहे. कंपाऊंडच्या आतमध्ये जणू आपण एका वेगळ्याच कार्पोरेट विश्वात असल्याचा भास होतो. मोरेवाडीच्या माळरानावर साकारलेल्या सुंदर लोकेशन्सनी, लाईट, कॅमेरा, ॲक्शनच्या आवाजाने कोल्हापूर चित्रनगरीला खऱ्या अर्थाने बहर आला आहे.कोल्हापूरला लाभलेल्या चित्रपटसृष्टीच्या परंपरेला आणखी पुढे नेण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरी सुरू झाली. मात्र जवळपास ३० वर्षे या वास्तूने दुर्दैवाचे दशावतार पाहिले. महाराष्ट्र शासनाने बंद करावयाच्या प्रकल्पांमध्ये चित्रनगरीचा समावेश केला, कोल्हापूरकरांच्या लढ्यामुळे ती कशीबशी वाचली, त्यावेळी ज्यांनी चित्रनगरीसाठी लढा दिला त्यांना आजचे तिचे रूप पाहताना स्वत:वरच अभिमान वाटावा, अशा उत्तमप्रकारे चित्रनगरीत विकासकामे व चित्रीकरण सुरू आहे.चोहोबाजूंनी कंपाऊंडनी सुरक्षित केलेल्या चित्रनगरीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत येताच चकचकीत रस्त्यावरून आपला पुढचा प्रवास सुरू होतो. पूर्वी बांधलेल्या पाटलाच्या वाड्याने पहिल्या टप्प्यातच विकास साधून घेतला. शेजारीच असलेल्या मोठ्या स्टुडिओला बाहेरून चारही बाजूंनी न्यायालय, महाविद्यालय, हॉस्पिटल, बंगल्याचे लोकेशन दिले आहे. बरोबर त्या समोर एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
रेल्वेस्टेशन, चाळ, मंदिर, भला मोठा स्टुडिओउजव्या बाजूला भव्य रेल्वेस्टेशन आकाराला येत आहे. त्याशेजारी पुलावरून जाणारा ट्रॅक बनत आहे. या लोकेशनपासून पुढे समोरच अतिशय सुंदर देखणी चाळ नजरेला पडते. त्याशेजारीच भला मोठा स्टुडिओ असून त्यात एका मालिकेचे चित्रीकरण शांतपणे सुरू होते. त्या समोरच्या मोठ्या स्टुडिओत गेलो तर आपण एखाद्या राजवाड्यात आलोय की काय, असा भास होतो, इतके सुंदर इंटिरिअर डिझाईन झाले आहे. शेजारी आश्रमात चित्रीकरण सुरू आहे. मागील बाजूस दगडी मंदिराचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. त्याशेजारी एक गावच वसविण्यात आले आहे.
विकास प्रकल्पाचे टप्पे असेचित्रनगरीच्या विकासाला २०१४-१५ मध्ये सुरुवात झाली तरी मागील चार वर्षात प्रकल्पाने वेग घेतला. फेज १, २, ३, अमृत योजना आणि सध्याचे फेज ४ असे विकासाचे टप्पे आहेत. सुरुवातीला फक्त मुख्य स्टुडिओ आणि वाड्याचे रूपडे पालटले गेले. आता एकाच वेळी पूर्ण परिसरात वेगाने वेगवेगळ्या लोकेशन्सची उभारणी सुरू आहे. आत्तापर्यंत ४० ते ४५ कोटी रुपये चित्रनगरीवर खर्च झाले आहेत.