कोल्हापूर : महिन्या-दीड महिन्यापासून घाऊक बाजारात दहा रुपये असणारी कोथिंबिरीची पेंढी आता पाच रुपयांवर आली आहे, आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.
गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरातही घसरण दिसत असून, घाऊक बाजारात किलोमागे दर चार रुपयांनी कमी झाले आहेत. डाळी व एकूणच कडधान्यांच्या दरांत मात्र फारसा चढउतार दिसत नाही. फळबाजारात अननस, तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढली असून, सीताफळाची रेलचेलही दिसत आहे.
घाऊक बाजारात सरासरी ३०० रुपये शेकडा दर झाल्याने किरकोळ बाजारातही दर खाली आले आहेत. भाजीपाल्याची आवकही हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू असून कोबी, वांगी, ढबू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका व फ्लॉवर या प्रमुख भाज्यांचे दर गत आठवड्यापेक्षा कमी आहेत.
साधारणत: किलोमागे दरांत तीन ते चार रुपयांची घसरण झालेली दिसते. पालेभाज्यांचे दरही काहीसे कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात मेथी, पोकळ्याची पेंढी दहा रुपये तर पालक पाच रुपये पेंढी आहे.कडधान्य बाजारात एकदम शांतता आहे. आवक व उठाव फारसा नसल्याने दरात चढउतार दिसत नाही. गहू, ज्वारी, नाचणीचे दर स्थिर आहेत. तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळ, मसूरडाळ या प्रमुख डाळींसह सरकी तेल, साखर, मैदा, आटा यांचे दरही कायम आहेत. मसाल्याचे तीळ, जिरे, खसखस, खोबऱ्याच्या दरांत किरकोळ प्रमाणात वाढ झाली असून, एकूण ही बाजारपेठ शांत आहे.
फळबाजारामध्ये अननस, तोतापुरी आंब्यांची रेलचेल वाढली आहे. तोतापुरीची आवक रोज २८ टनांपर्यंत गेली असून, गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत दुप्पट वाढ झाल्याने शहराच्या प्रत्येक चौकाचौकांत हातगाड्यांवर पिवळाधमक तोतापुरी पाहावयास मिळत आहे. ‘दशेरी’, ‘निलम’ आंब्यांचा हंगामही अंतिम टप्प्यात असून बाजार समितीत किरकोळ प्रमाणात त्याची आवक होत आहे.
कांदा वधारला!गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक निम्म्यावर आल्याने दर चांगलेच वधारले आहेत. घाऊक बाजारात चांगला कांदा १५ रुपयांना झाला असून, सरासरी दर बारा रुपयांपर्यंत आहे. बटाटा व लसणाची आवक कमी-अधिक असली तरी दरात मात्र फारसा फरक दिसत नाही.