कोल्हापूर : पंचगंगा नदीतकोल्हापूर शहरातील ४२ दशलक्ष लीटर विनाप्रक्रिया सांडपाणी मिसळत असून या काळ्या, दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पंचगंगेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नदीचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा या परिस्थितीचा पंचनामा करण्याचे सोपस्कार मंगळवारी शासकीय अधिकाऱ्यांकडून पार पडले.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साडेनऊ वर्षांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने दर तीन महिन्यातून एकदा पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. परंतु या साडेनऊ वर्षात याबाबतीत फारशी भरीव प्रगती झाली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा न्यायालयासमोर याबाबतचा अहवाल मांडण्याची मागणी प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्यात आले. यावेळी महापालिका उपायुक्त पंडित पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि दिलीप देसाई उपस्थित होते.
या पाहणीमध्ये अतिशय गंभीर अशी स्थिती असल्याचे दिसून आले
- जयंती नाला ओव्हरफ्लो होत असून त्यातून कचराही वाहत होता. तो काढण्याचे काम सुरू होते. परंतु हा काढलेला कचरा पुन्हा काठावरच ठेवला जात होता.
- जयंती नाला पंपिंग स्टेशनचे तीन पंप सुरू होते व हे सांडपाणी कसबा बावडा एसटीपी प्रकल्पाकडे पाठवले जात होते. तरीही नाला ओव्हरफ्लो झाला होता.
- जयंती नाल्याच्या खालच्या बाजूला खानविलकर पेट्राेल पंपाजवळून येणारा नाला मिसळत होता. तसेच विश्वकर्मा सोसायटीच्या मागील बाजूने सांडपाणी मिसळत होते. सिद्धार्थनगरमधील सांडपाणी व सीपीआरच्या नाल्यातील सांडपाणी जयंती नाल्यात मिसळून पुढे पंचगंगा नदीकडे जात होते. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होता.
- हे साडंपाणी मैलामिश्रित व काळेकुट्ट, फेसाळलेले होते. हे पाणी रक्तमिश्रित असल्याचे तक्रारदार दिलीप देसाई यांनी सांगितले.
- राजहंस प्रेसजवळील नाल्यातूनही सांडपाणी वाहत होते.
- छत्रपती कॉलनीतील नाला हा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीस मिसळत होता. यामध्ये काळसर सांडपाणी व कचरा होता.
- बापट कॅम्प नाल्यातील पाणी पंपिंगच्या खालील बाजूने वाहत होते व पुढे नदीत मिसळत होते.
- दुधाळी नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होता व पंचगंगेत मिसळत होता.
- या सर्व नाल्यांमध्ये कचर होता. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक होते. हा कचरा काढून काठावरच ठेवला जातो. तो पावसात पुन्हा पात्रातच जातो.
- पंचगंगा नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी केंदाळ साठले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या वरील बाजूला २ ते ३ किलोमीटर केंदाळ पसरले आहे.
रक्तमिश्रित पाणीही थेट नदीत
शहरातील अनेक चिकन सेंटर आणि सीपीआरमधील रक्तमिश्रित पाणी हे नाल्याच्या माध्यमातून थेट पंचगंगेत जात असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केला आहे. ते म्हणाले, सीपीआरमधून जे दूषित पाणी बाहेर पडते त्यावर प्रक्रिया होत नाही. त्यांचा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे रोगराई आणि रक्तयुक्त पाणी नदीत जाते.
ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरूसकाळी पाहणी करण्यासाठी हे अधिकारी सिद्धार्थनगरजवळच्या जयंती नाल्याजवळ गेले असता या ठिकाणी महापालिका कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत असल्याचे निदर्शनास आले. परंतु एकूणच परिस्थिती पाहता आजच्या या पाहणीच्या दिवशीच ही पावडर टाकली जात असल्याचे दिसून आले.प्रक्रिया प्रकल्प नसताना पूर्णत्वाचे दाखलेकोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातून रोज १४९.२ दशलक्ष लीटर प्रतिदिन सांडपाणी तयार होते. यातील १०६.७ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तर उर्वरित ४२.५ दशलक्ष लीटर सांडपाणी हे विनाप्रक्रिया नदीत साेडले जाते. मोठ्या हौसिंग सोसायटीचा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प असल्याशिवाय इमारतीचा पूर्णत्वाचा दाखल देऊ नये असा नियम असताना कोल्हापुरात महापालिका अधिकाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसवल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.