गुरुवारी दिवसभर धुवाधार पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. रस्ते जलमय झाले. शहरातील राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी, स्क्रॅप मार्केट, देवकर पाणंद चौक, सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक, विश्वपंढरी चौक, यल्लमा देवी मंदिर, नागाळा पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, केव्हीज पार्क, व्हीनस कॉर्नर, गांधी मैदान आदी परिसरात रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. उपनगर भागातही अनेक ठिकाणी पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. पाण्याचा योग्य निचरा झाला नाही.
-जामदार क्लबपर्यंत आले पाणी-
पंचगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढत असून गुरुवारी सकाळी संजय गायकवाड यांच्या पुतळ्यापर्यंत असणारे पाणी सायंकाळी जामदार क्लबच्या पुढे आले. रात्रीत ते पंचगंगा तालमीपर्यंत येण्याची शक्यता आहे. गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता सकाळपासून बंद करण्यात आला. जरगनगर ते निर्माण चौक, खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज हा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
-नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू-
पावसाचा जोर वाढत असल्यामुळे २०१९ मधील पूररेषेतील नागरिकांना पुराचा अधिक धोका आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयामार्फत त्या त्या भागात जाऊन गुरुवारी दुपारपासून लाऊड स्पीकरवरून आवाहन करण्यात येत होते. पावसाचा जोर आणि संकटाची चाहूल लागल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली. रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली येथील कुटुंबांना दुपारपर्यंत महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले. त्याचबरोबर रमणमळा ते कसबा बावडा आणि कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी परिसरातील अनेकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली.
- गांधी मैदान ओव्हरफ्लो -
शिवाजी पेठेतील गांधी मैदान शिवाजी तरुण मंडळाच्या बाजूने ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गांधी मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून निचारा होणारा मार्ग छोटा असल्यामुळे पाणी कमी होत नाही, याउलट मागून पाणी मैदानात येत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांचा पुतळा आणि शिवाजी तरुण मंडळ या दरम्यान असलेल्या दरवाजातून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. गांधी मैदान अशा प्रकारे ओव्हरफ्लो होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. मैदानावर किमान सात ते आठ फूट पाणी साचून आहे.