कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा विषय संवेदनशील असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण जनतेत एकमत झाल्याशिवाय एकतर्फी निर्णय घेणे चुकीचे होईल, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली जबाबदारी झटकली. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांची आज, मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन हद्दवाढी विषयी चर्चा केली. त्यावेळी मंत्री पाटील यांनी या विषयावर आपले मत सांगितले.हद्दवाढ संदर्भात यापूर्वीही एकमत झाले नाही, म्हणून 42 गावांच्या प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. आम्ही शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचे आराखडे तयार केले होते. तोपर्यंत आमची सत्ता गेली. नंतर काहीच काम झाले नाही. त्यामुळे आता काही निर्णय घ्यायचा झाला तर दोन्ही बाजूने एकमत झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील लोक दूध, भाजीपाला रोखण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे वातावरण चिघळण्यापूर्वी टप्प्या टप्प्याने का होईना हद्दवाढ करावी, अशी विनंती आर. के. पोवार यांनी केली. शहरात आता जागा नसल्यामुळे आम्हाला हद्दवाढ पाहिजे, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. त्यावर तुम्हाला उभा विकास करायला मिळेल, असे मंत्री पाटील म्हणाले. उभा विकास करायचा झाला तर पायाभूत सुविधावर मर्यादा आहेत. त्या लोकांना सुविधा देऊ शकत नाही याकडे इंदुलकरांनी लक्ष वेधले.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा संवेदनशील विषय, मंत्री चंद्रकांत पाटलांनी झटकली जबाबदारी
By भारत चव्हाण | Published: August 30, 2022 5:14 PM