कोल्हापूर : उद्यमनगरमधील एका हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. यावेळी मालक, व्यवस्थापक, कामगार, ग्राहकांसह नऊजणांना ताब्यात घेण्यात आले असून, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकातून उद्यमनगरातून कोटीतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान एके ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती डॉ. अमृतकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच पळापळ झाली. मात्र, सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये मालक जयेश मोहन रायगांधी (वय २८), व्यवस्थापक कल्पेश मोहन रायगांधी (३२, दोघे रा. रंकाळा) आणि कामगार लक्ष्मण यशवंत कुंभार (रा. हरिओमनगर) या तिघांंसह ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील रायगांधी हे दोघेही सख्खे भाऊआहेत.
या ठिकाणाहून तंबाखू ओढण्याचा हुक्का, व्हॅनिला, गुलकंद अशा विविध फ्लेव्हरचा तंबाखू, फ्रिजर असा अडीच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी रीतसर गुन्हे दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते.सिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २00३, महाराष्ट्र आणि सुधारित २0१८ या कायद्यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवा कायदा; लगेच कारवाईमुंबई येथे गतवर्षी प्रसिद्ध हुक्का पार्लरमध्ये आग लागल्यानंतर महाराष्ट्र शासनाने यासंबंधीच्या कायद्यात बदल करण्याचे ठरविले होते. त्यानुसार नुकताच याबाबतचा नवा आदेश काढण्यात आला आणि लगेचच कोल्हापुरात कारवाई करण्यात आली.
एका तासासाठी ४00 रुपयेया हुक्का पार्लरमध्ये वेगवेगळ्या फ्लेव्हरचा तंबाखू उपलब्ध असून, तो ग्राहकांना हुक्क्याद्वारे ओढण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असे. येथे प्रतितास ४00 रुपये घेतले जात होते, अशीही माहिती मिळाली आहे.