कोल्हापूर शहर, उपनगरात गणेश जयंती साजरी, भक्तांची मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:48 PM2019-02-08T16:48:48+5:302019-02-08T16:54:13+5:30
‘वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी झाली.
कोल्हापूर : ‘वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी झाली.
यानिमित्त पुरस्कार प्रदान, दूध वाटप , सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उमा टॉकिज परिसरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर, शुक्रवार पेठेतील न्यू शिवनेरी तरुण मंडळ, कोषागार कार्यालयाजवळील स्वयंभू गणेश मंदिर, शाहूपुरी सहावी गल्ली कुंभार गल्ली पंचमुखी गणेश मंदिर, जोशी गल्लीतील गणेश मंदिरात तर शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे जन्मकाळ व पालखी सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. गणेश भक्तांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.
गणेश जयंती निमित्त कोल्हापूरातील उमा टॉकिज परिसरामधील ओढ्यावरच्या सिद्धिविनायक मंदिरात शुक्रवारी गणेश मुर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)
सिद्धिविनायक मंदिर आकर्षक फुलांनी सजावट केले होते. सकाळी जन्मकाळ, गणेश आरती झाली. यानिमित्त गणेशमुर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. भक्तांनी भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. शुक्रवार पेठेतील न्यू शिवनेरी तरुण मंडळाच्या ‘शिवगणेश मंदिरात सांगली बुधगांव येथील प्रा. प्रकाश पाटील यांनी सपत्नीक यांच्या हस्ते श्री शिवगणेशमुर्तीस महाभिषेक व पूजा केली. श्री गणेश याग मनोज पोवार, दीपक येसार्डेकर, सिद्धार्थ -विकी भांबुरे, स्वप्नाली रासम, संदेश खेडेकर या दाम्पत्यांच्या हस्ते झाला.
दूपारी महापौर सरिता मोरे व नंदकुमार मोरे यांच्या हस्ते श्री गणेश जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी दूध वाटप करण्यात आले. सायंकाळी ‘शिवगणेशा’ची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघडया घालण्यात आल्या होत्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या हस्ते पालखीचे उदघाटन झाले.
गजानन महाराज नगरजवळील राजर्षी शाहू हौसिंग सोसायटी येथील श्री एकदंत गणेश मंदिरात विविध धार्मि कार्यक्रम झाले. आमदार राजेश क्षीरसागर, विश्वासराव माने यांच्या उपस्थितीत पालखी पूजन होऊन नगरप्रदक्षिणा सायंकाळी झाली.आज शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचबरोबर फुलेवाडी रिंग रोड बाळासाहेब इंगवलेनगरातील सिद्विविनायक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी बेले (ता. राधानगरी)येथील प्रवचनकार ह.भ.प.विनायक चौगुले महाराज यांचे प्रवचन झाले तर प्रमुख आचार्य उमेश बिडकर यांनीही मार्गदर्शन केले.
डांगे, पाटील पुरस्काराने सन्मानित...
येवती अपघातात जायबंदी झालेले पती अमर पाटील यांचे अवयव दान करणाऱ्या शीतल पाटील यांना ‘धीरोदत्त पत्नी’ तर वृत्तपत्रात विविध विषयावर लेखन करणारे प्रा. दिनेश डांगे यांचा कै. दत्तु बांदेकर पत्रकार पुरस्कार महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.न्यु शिवनेरी तरुण मंडळातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. डांगे यांनी पुरस्काराबद्दल आभार मानले.