कोल्हापूर : शहर पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याकरिता नवीन वेळापत्रक तयार करण्यात येत असून उद्या, शुक्रवारी महापौर, पदाधिकारी, गटनेते यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शहर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. कोणता व्हॉल्व्ह किती वाजता सोडावा, तो किती अट्ट्यापर्यंत सोडावा, कोणते व्हॉल्व्ह बदलावे लागतील या सर्वांचा विचार नवीन नियोजनात करण्यात येईल. अधिकारी स्तरावर नियोजन झाले की मग महापौर, पदाधिकारी, गटनेते यांच्यासमोर त्याचे सादरीकरण करण्यात येईल. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.एकदा नियोजन झाले की त्यात नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये, अशी आपली भूमिका असल्याचे सांगून आयुक्त चौधरी म्हणाले की, शहरातील गळतीचा कामनिहाय आढावा घेतला गेला. शाळा क्रमांक ९ , कसबा बावडा येथील गळती काढण्याची निविदाही काढण्यात आल्या आहेत. वर्क आॅर्डरही झाली आहे. त्यामुळे ही कामेही लवकर सुरू होतील. काही ठिकाणी व्हॉल्व्ह चोकअप झाले आहेत ते बदलले जातील.बालिंगा उपसा केंद्राची उपसा क्षमता वाढविण्यासह तेथील इलेक्ट्रीफिकेशनची कामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी काय करावे लागेल याचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.