कोल्हापूर : शहरातील रस्ते दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. महापालिकेतील विविध विभागांतील कामकाजाचा त्यांनी गुरुवारी महापालिकेचे निवडणूक कार्यालय येथे आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
याचबरोबर राज्य शासनाकडून महापुरातील नुकसानीबद्दल आलेले २५ कोटी, जिल्हा नियोजन मंडळाकडून ११ कोटी आणि तीन कोटी ५० लाख अशा ४० कोटींच्या निधीतून उर्वरित रस्ते नव्याने केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री पाटील म्हणाले, गतवर्षी आलेल्या महापुरामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. यासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी मिळाला असून निविदाही काढण्यात आली आहे. याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाकडून १४ कोटी ५० लाखांचाही निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे.
पावसामुळे थांबलेली कामे आठ दिवसांत सुरू होतील. उर्वरित ठिकाणांच्या खड्ड्यांचे १०० टक्के पॅचवर्क करण्यात येणार आहे. दोन दिवसांत नियोजन केले जाणार असून १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान ही कामे केली जाणार आहेत.झूम प्रकल्पात २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. आणखी ५० टन क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. येथील रस्त्याचे कामही तातडीने हाती घेतले जाणार आहे.