कोल्हापूर : शहरातील नाले सफाईच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. एकीकडे कोरोना संसर्ग, लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना मदतीचा हात देत असताना दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे आवश्यक असल्याने तेही काम सुरू करण्यात आले.सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी रामानंदनगर येथील ओढ्यातील तसेच मनोरा हॉटेल, कुंभार गल्ली येथील गाळा पोकलँडच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरामधील सर्वच लहान व मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येते. यामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत ४७६ लहान नाले, जेसीबीच्या साहाय्याने २३६ मध्यम नाले व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधळी व शामसोसायटी नाला पोकलँड मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्यात येतो.ही मोहीम लोकसहभागातून राबविण्यात येत असून, नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलँड मशीन आॅपरेटरसह विनाशुल्क उपलब्ध करून दिले. या मशीनला लागणारे इंधन स्वरा फौंडेशन पुढील पाच दिवस पुरविणार आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत दोन पोकलँड भाड्याने घेण्यात आलेले आहे. नालेसफाई मोहिमेत दोन जेसीबीसह ४0 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. एन. टी. सरनाईक कॉलनी व रामनंदनगर येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली.