लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील महापुराचा जबरदस्त फटका महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला बसला. शहराला पाणीपुरवठा करणारी तीन उपसा केंद्रे महापुराच्या पाण्यात अडकल्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीनंतर बंद पडली. परिणामी शुक्रवारी पाणीपुरवठा बेमुदत काळासाठी बंद झाला. महापालिका प्रशासनाने स्वत:चे १५, तर भाड्याने घेतल्या जाणाऱ्या २५ टँकरमधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
कोल्हापूर शहरासाठी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी भोगावती नदीवरील बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर येथून पाणी उपसा करण्यात येतो. ही तिन्ही केंद्रे नदीच्या काठावरच असल्याने महापुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत. त्यामुळे सर्व मोटारी बंद झाल्या. उपसा केंद्रे बंद झाल्यामुळे बालिंगा, पुईखडी व कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली. गुरुवारी शहराला पाणीपुरवठा झाला; परंतु शुक्रवारी संपूर्ण शहरास पाणीपुरवठा झाला नाही.
सन २०१९ साली आलेल्या महापुरात अशीच उपसा केंद्रे पाण्यात अडकल्यामुळे तब्बल पंधरा दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला होता. दहा दिवस ही यंत्रे पाण्यात होती, तर पुढील पाच दिवस त्यांच्या दुरुस्तीत गेली. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. ऐन महापुरात कोल्हापूरवर पाणीपुरवठ्याचे संकट उभे ठाकले आहे. ज्यावेळी महापूर ओसरला जाईल, तेव्हाच पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो, तसेच महापुराचे पाणी कधी ओसरले, पाणीपुरवठा कधी सुरू होईल हे सांगता येणे कठीण असल्याने पुढील आठ दिवस तरी किमान शहरावर पाणी संकट राहणार आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातून काही टँकर भाड्याने घेण्यात येत असून, २५ पैकी सात टँकर उपलब्ध झाले आहेत.