कोल्हापूर - शिंगणापूर बंधाऱ्यातील गळती काढण्याकरिता भोगावती नदीच्या पाण्याची पातळी कमी करावी लागल्याने बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर उपसा रविवारी दुपारनंतर बंद ठेवावा लागेल. त्यामुळे आज, सोमवारी तसेच मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, या गळती काढण्याच्या कामास रविवारी दुपारनंतर सुरुवात झाली.
कोल्हापूर शहराला भोगावती नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर येऊन नदीतील पाण्याचा उपसा करण्यात येतो. त्यापैकी शिंगणापूर बंधाऱ्यातील सहा गाळ्यातून पाण्याची गळती सुरू होती. त्यातील चार गाळ्यांमधून होणारी गळती या आधीच थांबविण्यात आली आहे. परंतु बंधाऱ्यातील चार क्रमांक व पाच क्रमांकाच्या गाळ्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने तसेच तेथील लोखंडी प्लेटस् अडकल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी करावी लागणार होती. पाटबंधारे विभाग व महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयातून गळती काढण्याचे काम हाती घेतले आहे.