कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या वर्षात सुरुवातीला दहा - वीस काेरोनाचे रुग्ण आढळून येत होते, आता तर ही संख्या नव्वदपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची रविवारपासून कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
सोमवारी रात्री आठ वाजताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त चेतन कोंडे, संदिप घार्गे यांच्यासह सर्व अधिकारी रस्त्यावर उतरले. त्यांनी मुख्य बाजारपेठा, भाजी मंडई, व्यापारी दुकाने, हॉटेल्स, खाऊगल्ली यासह सर्व आस्थापना बंद करण्याचे आवाहन केले.
रंकाळा चौपाटी, पदपथ उद्यानसह शहरातील विविध बागातून फिरायला गेलेल्या नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे तेथील हातगाड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद झाले. पोलीसही सोबत असल्याने संपूर्ण शहर रात्री आठ वाजता बंद झाले. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली.
- शहरात दोन रुग्णालये सज्ज -
शहरातील आयसोलेशन रुग्णालयासह सानेगुरुजी वसाहतीत निर्माण करण्यात आलेले तात्पुरते रुग्णालय कोरोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. कसबाबावडा येथील तात्पुरते रुग्णालय देखील तयार केले जात आहे. सध्या रुग्ण जरी वाढत असले तरी बहुतांशी रुग्ण सीपीआर, आयसोलेशन बरोबरच घरी उपचार घेत आहेत. ज्या घरात रुग्ण आहे, त्यांच्या घराच्या दारावर स्टीकर चिकटविण्यात येत आहे.
प्रभागासाठी सचिव नेमणार -
गेल्या वर्षी शहरात प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या सचिवांनी चांगले काम केले होते. संपूर्ण शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, नागरिक नियम पाळतात की नाही यावर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य झाले होते. गुरुवारपासून सर्व सचिव पुन्हा कार्यरत राहणार आहेत, त्यांच्या नेमणुकीचे आदेश निघाले आहेत, असे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.
दंडात्मक कारवाई सुरुच-
महानगरपालिका पथकांकडून विनामास्क, शारीरिक अंतर व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल २७४ व्यक्तींवर कारवाई करुन ३३ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. पालिकेची पथके मास्कचा वापर करण्याचे लाऊडस्पीकरवर आवाहन करीत शहरातून फिरत होती.