कोल्हापूर : मंगळवार पेठेतील एका बिअर बारमध्ये बसलेल्या कुणाल किरण गवळी (वय २६, रा. माळी गल्ली, मंगळवार पेठ) या कापड दुकानदारावर दहा ते बाराजणांनी रविवारी रात्री हल्ला केला. यात त्याचे डोके, पाठ व मांडीवर बाटल्या फोडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाइकांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकारानंतर मंगळवार पेठेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी, कापड दुकान चालविणारा कुणाल गवळी हा तरुण आपल्या मित्रांसोबत मंगळवार पेठेतील एका बारमध्ये बसला होता. यावेळी दहा ते बारा तरुण आले. यांनी कुणालबरोबर वाद घालून त्याला मारहाण सुरू केली. बिअरच्या बाटल्या त्याच्या डोक्यात, पाठीवर फोडल्या; त्यामुळे तो जखमी झाला. हा प्रकार पाहून त्याचे सहकारी तेथून पळून गेले.कुणालवर बारमध्ये हल्ला झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांना व मित्रांना समजल्यावर ते तातडीने तेथे गेले. जखमी कुणालला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या मारहाणीची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बार बंद करण्यास सांगितले. बारमधील खुर्च्या विस्कटल्या होत्या, तर काचांचा खच पडला होता. पोलिसांनी पंचनामा करून तेथे बंदोबस्त ठेवला.मंगळवार पेठेत कुणाल गवळी याच्यावर हल्ला झाल्याचे समजल्यावर त्याचे मित्र व नातेवाईक सीपीआर रुग्णालयात गोळा झाले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात आले.पोलिसांनी कुणालचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो गंभीर जखमी असल्याने त्याच्या मित्रांकडून हल्लेखोरांची नावे विचारून घेतली जात होती. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके फिरत होती. दरम्यान, मंगळवार पेठेत वातावरण तंग असल्याने तेथील परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त नेमला होता.