कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले तरी दाट धुक्याची चादर बाजूला होत नाही. धुक्यामुळे तर पाच फुटांवरीलही दिसत नव्हते.साधारणत: जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी हळूहळू कमी होत जाते. फेबु्रवारीपासून तापमानात वाढ होत जाऊन कडक उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मकर संक्रांतीनंतर थंडी गायब झाली आणि वातावरण गरम होऊ लागले. त्यामुळे उन्हाचे चटके लवकरच सोसावे लागणार असे वाटत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत गेला.
पहाटे दाट धुक्याचे पांघरूण पाहावयास मिळते. त्यात अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. नदीकाठच्या गावांना तर सकाळी सात वाजेपर्यंत दाट धुक्याने झाकून टाकलेले दिसते. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला असून, शेतातील शेतमजुरांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऊसतोड मजुरांना तर वाळलेला पाळापाचोळा पेटवूनच ऊसतोड करावी लागत आहे, इतका गारठा आहे. मॉर्निंग वॉकसाठी भल्या पहाटे घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळी सहा वाजले तरी अंथरूण सोडवत नाही.
ताप, सर्दीचे रुग्ण वाढलेधुके व थंडीमुळे सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ होत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णालयांत गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे.
अपघातांचे प्रमाण वाढलेदाट धुके, त्यात रस्त्यावर पडणाऱ्या बारीक दवामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे चार-पाच फुटांवरील दिसत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
असे राहील तापमान डिग्रीमध्ये
वार किमान कमालबुधवार १५ ३१गुरुवार १६ ३१शुक्रवार १५ ३२शनिवार १६ ३१