कोल्हापूर : शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये सोमवारपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू झाले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही विद्यार्थ्यांची निराशा झाली असली तरी शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करीत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.कॉलेज म्हणजे स्वातंत्र्य, धमाल, नवे क्षितीज, नवे मित्र-मैत्रणी, उत्सव.. असे अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत सोमवारी महाविद्यालयात प्रवेश करीत होता. काही पालक आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी आले, तर काहीजण मित्र, मैत्रणींसह कॉलेजकडे येत होते. काहीजण प्रथमच महाविद्यालयात प्रवेश करीत होते, तर काही विद्यार्थ्यांनी पालकांसोबत शनिवारी येऊन अकरावीचा वर्ग कुठे भरतो यांची चौकशी करून गेले होते. शहरातील काही महाविद्यालयेसकाळच्या सत्रात, तर काही महाविद्यालये दुपारच्या सत्रात भरली होती.पहिल्या दिवशीच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी तारांबळ उडाली तरी पहिला दिवस असल्याने भर पावसातही अनेकांनी हजेरी लावली. पहिला दिवस फक्त ओळखपरेडच घेण्यात आली, तर अनेकांना नवीन मित्र, मैत्रिणींची ओळख झाल्याने एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
शालेय जीवनातून महाविद्यालयात प्रथमच प्रवेश करीत असल्याने मनात एक वेगळी उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी नवे मित्र मिळाल्याने खूप मस्त वाटते.सोहम चिखलव्हाळे, कणेरी
शाळसारखे या ठिकाणी काही बंधन नसल्याने जरा मोकळे वाटते. पहिल्या दिवशी शिक्षकांनी अभ्यासक्रम व ओळख करून दिल्यामुळे मनातील काही शंका दूर झाल्या.तेजस पाटील, कोगे.