कोल्हापूर : महापालिकेच्या सर्व विभागांकडील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित विभागप्रमुखांना गुरुवारी केले. घरफाळा, नगररचना, स्थानिक संस्था कर वसुली असमाधानकारक असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मार्च महिना संपण्यास काही दिवस राहिले असल्याच्या पार्श्वभूमीवर वसुलीच्या अनुषंगाने नगररचना, परवाना, पाणीपुरवठा, स्थानिक संस्था कर व घरफाळा, आदी विभागांच्या वसुलीचा आढावा घेण्याकरिता आयुक्तांनी बैठक घेतली. बैठकीत सर्वच विभागांची आजपर्यंत झालेली जमा व उर्वरित कालावधीत होणारी जमा याविषयी सर्व विभागप्रमुखांकडे आयुक्तांनी विचारणा केली.
नगररचना विभागाकडून अद्यापही समाधानकारक वसुली झाली नसल्याने उर्वरित दिवसांत जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश उपशहर नगर रचनाकार नारायण भोसले यांना दिले. पाणीपुरवठा विभागाची कारवाई समाधानकारक असली तरी वसुलीची उद्दिष्टपूर्ती होणे गरजेचे असून याकरिता प्रभावीपणे मोहीम राबवा, अशा सूचना केल्या. घरफाळा विभागाकडून उर्वरित कालावधीत ३० कोटींपेक्षा जास्त जमा होणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या. स्थानिक संस्था कर विभागाकडील जमा अत्यंत अल्प असून कारवाई करून जास्तीत जास्त वसुली करवी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, घरफाळा विभागाकडील अधीक्षक विशाल सुगते, विलास साळोखे, राहुल लाड व विजय वणकुद्रे, परवाना अधीक्षक राम काटकर, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत उपस्थित होते.