कोल्हापूर : चार महापौर होऊन गेले तरीही समाधीस्थळाचे काम अपूर्णच राहिले आहे. आता आयुक्तही जाण्याची वाट बघताय का? अशा शब्दांत सोमवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शाहू समाधीस्थळाचे काम रखडल्याप्रकरणी शिल्पकार, ठेकेदारांची कानउघडणी केली. १५ जानेवारीपर्यंत काम झाले नाही, तर ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा इशाराही यावेळी आयुक्तांनी दिला. आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शिल्पकार आणि ठेकेदार यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला.महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ. चौधरी यांनी सोमवारी दुपारी १२.00 वाजण्याच्या सुमारास नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधीस्थळाच्या कामाची पाहणी केली. दोन महिन्यांपूर्वी कामाची जी स्थिती होती, तीच सोमवारीही असल्याचे पाहून आयुक्त चौधरी भलतेच संतापले. त्यांनी ठेकेदार, शिल्पकार यांना चांगलेच फैलावर घेतले; त्यामुळे महापालिकेचे अधिकारीही सटपटले.
निधी उपलब्ध करून दिला असतानाही कामे रेंगाळली जात असतील, तर योग्य नाही. चार महापौर होऊन गेले, आता आयुक्त जाण्याची वाट पाहत आहात का? अशी विचारणा आयुक्तांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांना केली.माजी नगरसेवक आदिल फरास यांनीही काम रखडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. चार वर्षांपासून काम सुरू आहे. यापुढे जर मुदतीत काम केले नाही, तर मात्र कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शाहू महाराजांच्या समाधीचे काम आहे, ते रेंगाळता कामा नये म्हणून आम्ही निधीची तरतूद करूनही ते रेंगाळले आहे, हे यापुढे खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.उपमहापौर शेटे यांनी शिल्पकारास मेघडंबरीचे काम पूर्ण करण्यास १० जानेवारी, तर ठेकेदारास कंपौंडवॉल, आतील फुटपाथ, विद्युतीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा, आदी कामे करण्यास तीन महिन्यांची अंतिम मुदत दिली. या मुदतीत कामे झाली नाहीत, तर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.
आयुक्तांसह लोकप्रतिनिधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळलेल्या ठेकेदार, शिल्पकाराने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. जलदगतीने कामे करावीत, अशा सूचना दोघांनाही देण्यात आल्या.यावेळी माजी महापौर हसिना फरास, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका उमा बनछोडे, मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने उपस्थित होते.
शरद पवारांना बुधवारी भेटणारसमाधीस्थळातील म्युझियम, लॅँडस्केपिंग ही कामे पूर्ण करण्याकरिता ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तो मिळविण्यासाठी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आदिल फरास बुधवारी पुणे येथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटणार आहेत. पवार यांच्याकडे उर्वरित निधी मागण्यासह त्यांना समाधी लोकार्पण समारंभाचे निमंत्रणही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.