कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले असून अभय योजनेमध्ये सहभागी बहुतांश व्यापाऱ्यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापाऱ्यांचे कर निर्धारण १५ जानेवारीअखेर सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थानिक संस्था कर विभागाला दिले.महानगरपालिकेने असोसिएशननिहाय करनिर्धारण पूर्ण करण्याबाबात विविध असोसिएशनना पत्राने कळविले आहे. बहुतांशी असोसिएशनकडून याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे.
दि. ८ ते १५ जानेवारीअखेर स्थानिक संस्था कर विभाग, शिवाजी मार्केट दुसरा मजला येथे कार्यालयीन वेळेत व्यापाऱ्यांकडून कागदपत्रे स्वीकारणे, त्यांचे म्हणणे व तक्रारी ऐकून घेण्याकरीता शिबिर आयोजित केले आहे. नियमातील तरतुदीनुसार व्यापाऱ्यांना संधी म्हणून यापूर्वी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
विहीत मुदतीनंतरही कागदपत्रे न आल्यास एकतर्फी निर्णय घेऊन करनिर्धारण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांनी आपली कागदपत्रे या शिबिरात देऊन करनिर्धारण पूर्ण करून कराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन एलबीटी विभागामार्फत करण्यात आले आहे.