कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलाचे रखडलेले काम तत्काळ सुरू करावे, कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केला.निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ व २०१४ मध्ये ३३ कोटींच्या सर्वसोईनीयुक्त अशा क्रीडा संकुलाची घोषणा केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंची सोय होईल, असे वाटत होते; पण गेली तीन वर्षे क्रीडा संकुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हे क्रीडा संकुल होणार का?, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यानी क्रीडा संकुलाला निधी कमी पडू देणार नाही, असे म्हटले आहे; पण क्रीडा उपसंचालकांचे क्रीडा संकुलाकडे लक्ष नाही. त्यामुळे क्रीडा संकुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न उपस्थित राहतो.हा सगळा गोंधळ सुधारून चांगल्या स्थितीमधील क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी केले. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संजय कुराडे, संजय पडवळे, सुनील जाधव, अनिल घाडगे, संजय धावरे, अभिषेक शिंदे, उत्कर्ष बचाटे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.