कोल्हापूर : विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने सोनवडे घाटाबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी आजही सामान्य माणसाला मूलभूत गरजा देता आलेल्या नाहीत.
आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांना रस्ताच नाही. एकीकडे राज्यकर्ते ‘अच्छे दिन’च्या गप्पा मारतात पण गेल्या चार वर्षांत दुर्गम वाड्या-वस्त्यांवर ‘अच्छे दिन’चे वारेही पोहोचलेले नाही. मोठ-मोठ्या शहरांना गोंजारत असताना ज्या शहरांना जगवण्याचे काम करते ते खेडे मात्र प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित राहिले आहे.
राधानगरी तालुक्यातील धनगर वाड्यांची अवस्था काय आहे. आजही येथील लोकांना दहा-बारा किलोमीटर जंगलातून पायपीट करत यावे लागते. उचंगी, धामणीसारखे अनेक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
हे प्रकल्प झाले तर सामान्य माणसांच्या जीवनात हरितक्रांती येईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाच्या प्रत्येक बैठकीत केवळ आश्वासन देतात. सभागृहात दिलेला ‘शब्द’ न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून विकासाची काय अपेक्षा करायची.मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी दहा रस्ते करा, आमची त्याला हरकत नाही. पण अगोदर मूलभूत सुविधा तरी द्या. सोनवडे घाट होण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपडत आहेत, त्यातून सामान्य माणसांचा फायदा काय? घाट होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या.
धनदांडग्यांचे अलिशान फार्म हाऊस उभारण्यासाठीच फायदा होणार आहे. त्याऐवजी पर्यटन विकासासह सामान्य माणसांच्या हाताला काम कसे देता येईल? यासाठी नियोजन केले पाहिजे.
चांदोली ते गोवा व्हाया गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगडमार्गे रस्ता केला तर या भागातील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. जंगलात राहणारे लोकांच्या रानमेव्याला चांगला दर मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल, तसा प्रकल्प अनेकवेळा आपण मांडला आहे.