विश्वास पाटील
कोल्हापूर : एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.राज्यातील यंदाचा हंगाम तीस टक्के संपला आहे. यंदा सरकारने ६३० लाख गाळप टनाचा अंदाज केला होता; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला परतीच्या पावसामुळे यंदा किमान ५० लाख टन गाळप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यात हे गाळप वाढणार आहे. नव्या अंदाजानुसार ६८० लाख टन गाळप व ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.भविष्यात साखरेचे दर चांगले राहतील असे गृहीत धरून कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे; परंतु साखरेचे दर ३ हजारांवर आल्यावर तेवढीच पहिली उचल देताना कारखान्यांची दमछाकच होणार आहे. इतर बिले थांबवून कारखाने तूर्त काहीतरी व्यवस्था करू शकतील परंतु दर घसरला तर राज्य बँकेकडून मिळणारी उचल कमी होणार असून कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत याची काळजी घेण्याऱ्या केंद्र सरकारने कारखान्यांना किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी निर्यातीस प्रोत्साहन किंवा बफर साठा करून बाजारातील दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विजय औताडेसाखर उद्योगातील तज्ज्ञ
हंगामाचे असेही वैशिष्ट्ययंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २९ कारखाने वाढले आहेत. त्यामध्ये सहकारी १० व खासगी १९ वाढले. प्रतिदिन गाळपही १ लाख ५४ हजार टनांनी वाढले. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. आतापर्यंत १ कोटी टनांचे गाळप जास्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे टनेज वाढले परंतु उतारा मात्र पाँईट २ ने घसरला आहे.राज्यातील १८ डिसेंबरअखेरचे गाळपविभाग हंगाम सुरू झालेले कारखाने गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख टन) उतारा टक्के(कंसातील आकडे खासगी कारखान्यांचे)
- कोल्हापूर २६ (११) ६७.२२ ७.४६ ११.११
- पुणे ३०(३०) ११२.४० ११.२६ १०.०३
- अहमदनगर १५ (०९) ३९.९५ ०३.७२ ०९.३३
- औरंगाबाद ११(०९) २३.९१ ०१.९४ ०८.१३
- नांदेड १४(१५) ३५.३९ ०३.६८ ०९.२४
- अमरावती ०० (०२) ०२.१७ ००.०२ ०९.५०
- नागपूर ०० (०४) ०१.७१ ००.०१ ०८.४२
एकूण १४७ (६१) २८२.७६ २८.२९ ०९.९१