कोल्हापूर : महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या गुंड विजय ऊर्फ काळू ऊर्फ काळबा रामभाऊ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई रेल्वे फाटक, कोल्हापूर) याची प्रकृती गंभीर आहे.
‘सीपीआर’ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या चेहऱ्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्याला प्राणवायु पुरविला जात आहे. या घटनेनंतर कोल्हापूर व उपनगरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सानप यांनी झाडलेल्या गोळीतून तो जखमी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दैव बलवत्तर म्हणूनच जखमी पोलीस कर्मचारी श्रीकांत मोहिते आणि राजेंद्र सानप यांचे प्राण वाचले.
या प्रकरणात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे तपास करीत असून, त्यांनी काही साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाचा पंचनामा केला.खंडणी, मारामाऱ्या, अपहरण, आदी गुन्हे दाखल असलेला व पोलिसांच्या रेकॉर्डवरील ‘वाँटेड’, ‘काळ्या गँग’चा प्रमुख विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांना चकवा देत होता. तो गुरुवारी सासऱ्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी सासरवाडीत आल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
यावेळी पोलीस कर्मचारी मोहिते यांनी काळबावर पाठीमागून झडप घालून खाली पाडले. यावेळी त्याने त्यांना हिसडा मारून त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. ती मोहिते यांनी चुकवली. यावेळी मागे पोलीस उपनिरीक्षक सानप उभे होते. काळबा याने मागे फिरून सानप यांच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.
गोळी पिस्तुलातच अडकून राहिल्याने अवघ्या पाच फुटांवर उभे असलेले सानप बचावले. त्यांनी तत्काळ आपल्याकडील पिस्तुलातून काळबाच्या हातावर गोळी झाडली असता, ती त्याच्या गालातून आरपार गेली.
काळबावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याची जिभ अर्धवट तुटली आहे. चेहऱ्याचा एका बाजूचा गाल पूर्णपणे फाटला आहे. त्याला बोलताही येत नाही. महिना-दोन महिने तो बोलू शकणार नाही, अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे; त्यामुळे त्याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा त्याने कोठून आणला याबाबत काहीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
त्याच्या पत्नीचा, शेजारील काही लोकांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी काळबाच्या प्रकृतीची विचारपूस शुक्रवारी ‘सीपीआर’मध्ये केली.