कोल्हापूर : नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेचा कळंबा (ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. राजश्री गिरीश पोवार (वय ३२, रा. आम्रपाली अपार्टमेंट, अंबाई टँक, रंकाळा) असे त्यांचे नाव आहे.
येथील डॉ. वैशाली अमोल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; तरच मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात गोंधळ घातला.लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी ‘तक्रार द्या, गुन्हा दाखल केला जाईल,’ असे सांगितल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.अधिक माहिती अशी, राजश्री पोवार या गर्भवती राहिल्यापासून कळंबा येथील अंकुर रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले होते. जुळे असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्या एक दिवसआड तपासणीसाठी रुग्णालयात येत होत्या. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितली होती.
बुधवारी त्यांच्यावर प्रसूतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला होता; परंतु मंगळवारी सकाळी त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी नऊच्या सुमारास रुग्णालयात आणले. डॉ. वैशाली पाटील यांना तसा निरोप दिला; परंतु त्या साडेअकराच्या सुमारास रुग्णालयात आल्या. तब्बल अडीच तास राजश्री यांना उपचार न मिळाल्याने त्या बेशुद्ध पडल्या.
प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे समजताच डॉ. पाटील यांनी नातेवाइकांच्या कारमधूनच तत्काळ ‘सीपीआर’ला आणले. या ठिकाणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, राजश्री यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या आई, बहीण, वडील, भाऊ, पती आणि पाच वर्षांच्या मुलाने हंबरडा फोडला.राजश्री यांचे पती राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांना पाच वर्षांचा शर्व नावाचा मुलगा आहे. त्यांचे माहेर शनिवार पेठेतील सोन्यामारुती चौकात असल्याने येथील नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राजश्रीचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नातेवाइकांनी गोंधळ घातला.
डॉ. पाटील ‘सीपीआर’मध्येच होत्या. त्यांना पाहताच संतप्त नातेवाइकांनी त्यांना धक्काबुक्की केली. येथील सुरक्षारक्षकांनी त्यांची सुटका करून घेत त्यांना एका खोलीत बसविले. या प्रकाराची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच निरीक्षक बाबर सहकाऱ्यांसमवेत आले. त्यांनी घटनेची माहिती घेत नातेवाइकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यास परवानगी दिली. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.मानसिक धक्काराजश्री पोवार ह्या आई आणि पतीसोबत बोलत-चालत रुग्णालयात आल्या. काही तासांत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच दोघांनाही मानसिक धक्का बसला. त्यांच्या पतीसह सासरे धनाजी पोवार यांना धक्क्याने भोवळ आली. पोवार कुटुंबीयांच्या आक्रोशाने सीपीआर परिसर शोकाकुल झाला. पाच वर्षांचा शर्व ‘माझ्या मम्मीकडे मला सोडा,’ असे म्हणत होता. यावेळी त्याने टाहो फोडत बापाला मारलेली मिठी पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.उपचारात हलगर्जीपणा नाही : डॉ. वैशाली पाटीलराजश्री पोवार यांना जुळे होते. त्यांचा रक्तदाब वाढला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून आम्ही त्यांना प्रसूती शस्त्रक्रिया करण्यास सांगत होतो. परंतु त्यांनी आज, बुधवारचा मुहूर्त काढला होता. त्यामुळे त्या रुग्णालयात दाखल झाल्या नव्हत्या. मंगळवारी त्या रुग्णालयात आल्या.
सोनोग्राफी केली असता बाळांची प्रकृती चांगली होती. त्यानंतर अचानक फिट येऊन त्या कोसळल्या. यावेळी उलटी होऊन नाकातोंडात गेल्याने त्यांचा श्वास गुदमरला. त्यांना वाचविण्यासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. माझ्याकडून उपचारांमध्ये हलगर्जीपणा झालेला नाही, असे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले.