कोल्हापूर : लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:04 PM2018-05-18T17:04:44+5:302018-05-18T17:04:44+5:30
‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
कोल्हापूर : ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
भाजपच्या सत्तापिपासू धोरणाचा निषेध करण्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला.
‘नहीं, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी’, ‘मोदी सरकार... हाय हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. त्याच्या निषेधार्थ आणि कोणत्या पद्धतीने भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे याचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देणे अयोग्य आहे.
या निदर्शनांमध्ये प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील, दीपा पाटील, नगरसेविका सुरेखा शहा, माजी महापौर सुलोचना नायकवडी, नगरसेवक अर्जुन माने, तौफिक मुल्लाणी, दिलीप पोवार, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, संजय मोहिते, विक्रम जरग, सचिन चव्हाण, एस. के. माळी, संपतराव चव्हाण-पाटील, किशोर खानविलकर, अश्पाक आजरेकर, शिवानंद बनछोडे, सर्जेराव शिंदे, भगवान जाधव, शिवाजी कांबळे, हिंदुराव चौगुले, बाजीराव सातपुते, उमेश पोर्लेकर, रणजित पोवार, आदी सहभागी झाले.
निषेधाचे फलक
बहुमतासाठी नाहीत आमदार ११२, भाजपने लोकशाहीचे वाजविले ३-१३, लोकशाही वाचवा, देश वाचवा; गोवा, मणिपूर,मेघालयात संधी बहुमत असलेल्या आघाडीला; मग कर्नाटकातच का राहावे काँग्रेस-जेडीएसने पिछाडीला?’ असे निषेधाचे विविध फलक घेऊन कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.