कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकातून दिली.गेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत १९ वेळा वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल ८०, तर डिझेलचा दर ७० रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी दुपारी एक वाजता शाहू पुतळा, दसरा चौकातून बैलगाडी, सायकलींवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले जाणार आहे.
आजी, माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, आजी-माजी महापौर, नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पत्रकातून केले आहे.