कोल्हापूर : रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. इथून पुढेही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकोसह पुलाला भिंत बांधण्याचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी येथे केले.कृती समितीने सोमवारी (दि. ७) पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी चार दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा व पुलाला भिंत बांधण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी कृती समितीने असे आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे.
शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे आहे ते प्रयत्न आपण केले आहेत. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत रखडलेल्या कामाला परवानगी देता येईल का, याबाबत आपत्ती व्यवस्थापनचे संचालक दौलत देसाई यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती कागदपत्रेही देण्यात आली आहेत.
इथून पुढेही आपल्या अधिकारात जे शक्य आहे त्याबद्दलचा प्रयत्न आपण करणार आहोत; त्यामुळे समितीने आपला निर्णय मागे घ्यावा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पाऊल उचलू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. याबाबतचे पत्र कृती समितीला देण्यात येणार आहे.