कोल्हापूर : ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरात राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टसह विविध धर्मिय, समाजबांधवांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा, विविध वेशभूषेतील मावळे, मर्दानी खेळांच्या कसरती, वारकरी पथक, झांजपथक, धनगरी ढोलपथक, सामाजिक कार्याची माहिती देणारा स्क्रीन, प्रबोधनात्मक फलक असणार आहेत. भगवी साडी परिधान करून महिला सहभागी होणार आहेत.
मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीची सुरुवात होईल. शाहू बँक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी चौक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.
गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने शिस्तबद्ध, डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने हा मिरवणुकीचा सोहळा साजरा होत आहे. यावर्षी खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, शासकीय अधिकारी, नगरसेवक, शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
जनतेचा लोकोत्सव भव्यतेने साजरा करण्यासाठी शिवप्रेमी बंधू-भगिनींनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.
वारकरी बंधूंनी आवाहनछत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या स्वधर्म व स्वराज्याच्या संकल्पनेला उजाळा देण्यासाठी शक्ती आणि भक्तीच्या संगमाचे प्रतिबिंब दाखविण्यासाठी या मिरवणुकीत वारकरी बंधूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुळीक यांनी केले.