संतोष मिठारी ।कोल्हापूर : फौंड्री उद्योगातील ‘वेस्ट सँड’च्या पुनर्वापरासह तिची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आता देशी तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील धातुतंत्र प्रबोधिनी आणि मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांनी संशोधनातून ‘वेस्ट ग्रीन सँड रिक्लेमेशन’हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात फौंड्री उद्योगाचा मोठा वाटा आहे. या फौंड्री उद्योगात कास्टिंगच्या उत्पादनासाठी सँडचा (वाळू) वापर केला जातो. कास्टिंगच्या उत्पादनानंतर तयार होणाऱ्या वेस्ट सँडची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अथवा ती पुनर्वापरण्यासाठी तयार करण्याचे आव्हान या उद्योगासमोर आहे. फौंड्री क्लस्टर योजनेअंतर्गत कोल्हापुरात सँड रिक्लेमेशनसाठी १२ ते १५ कोटी रुपयांची यंत्रसामग्री चीनमधून आयात केली आहे. संबंधित यंत्रसामग्रीचा वापर सर्वांना करणे शक्य होत नाही; त्यामुळे छोट्या फौंड्री उद्योगांसमोरील वेस्ट सँडचे आव्हान कायम आहे. या सँडमध्ये रसायनाचा वापर केला जात असल्याने तिचे पर्यावरणपूक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते.
या सर्व बाबींचा विचार करून धातुतंत्र प्रबोधिनी आणि आयआयटी, मुंबईने या वेस्ट सँडच्या पुनर्वापर, योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मितीसाठी एकत्रितपणे गेल्या अडीच वर्षांपासून संशोधन सुरू केले. याबाबत त्यांनी सामंजस्य करार केला आहे. ‘आयआयटी’तील डॉ. गजाननराव जाधव, डॉ. संजय महाजनी, प्रा. दसकामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी रोहित विश्वकर्मा, मोईज खान, हृषीकेश चिमकर, विठोबा मलगांवकर यांनी संशोधनाचे काम केले आहे. त्यांनी ‘वेस्ट ग्रीन सँड रिक्लेमेशन’ हे पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे वेस्ट सँडचा पुनर्वापर करता येणार असल्याने उत्पादन खर्च सरासरी २० टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यासह या सँडचा प्रश्न पर्यावरणपूरक पद्धतीने मार्गी लागणार असल्याने उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.असे आहे तंत्रज्ञानपूर्णपणे देशी स्वरूपाचे हे तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये ‘बॉलमिल’द्वारे वेस्ट सँडवर प्रक्रिया करून त्यातील ‘डेड क्ले’ बाजूला केली जाते. त्यामुळे ही सँड पुन्हा वापरता येते. या तंत्रज्ञानाद्वारे एक किलो वेस्ट सँडवर प्रक्रिया करण्यास ५० पैसे इतका खर्च अपेक्षित आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रारूपाची आॅक्टोबरअखेरीस चाचणी घेण्यात येईल. या प्रारूपाबाबत उद्योजकांची मते जाणून घेऊन पुन्हा त्यामध्ये काही बदल करून हे तंत्रज्ञान अंतिम केले जाणार आहे. टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अॅँड डिझाईनने हा प्रकल्प प्रायोजित केला असल्याचे या प्रकल्पाचे समन्वयक प्रा. शशांक मांडरे यांनी सांगितले.कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील धातुतंत्र प्रबोधिनी आणि मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांनी संशोधनातून विकसित केलेल्या ‘वेस्ट ग्रीन सँड रिक्लेमेशन’ तंत्रज्ञानाचे प्रारूप.
‘झिरो वेस्ट’ संकल्पनेवर आधारित हे तंत्रज्ञान आहे. त्याची प्राथमिक स्वरूपातील चाचणी यशस्वी झाली आहे. वेस्ट सँडवर प्रक्रिया करून जे ‘डेड क्ले’ बाजूला होते त्यांच्यापासून बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाºया विटा तयार करण्याचे संशोधन सुरू आहे.- रोहित विश्वकर्मा, संशोधक विद्यार्थी