कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीसह पार्सल, कुरिअर सेवा महागण्यात झाला आहे.गेल्या आठ महिन्यांत डिझेलच्या दरामध्ये १२ रुपये १९ पैसे इतकी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस डिझेलचे भाव पेट्रोलच्या भावालगत येत आहे. मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना इंधन म्हणून डिझेल लागते; त्यामुळे डिझेलच्या प्रतिलिटर भावात वाढ झाली की, आपोआप जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ होते; त्यामुळे डिझेल दरवाढही सर्वसामान्यांच्या मुळावर येते.
दिवसेंदिवस दरवाढीमुळे धान्य, कडधान्ये, जीवनावश्यक वस्तू, आदींचे भावही वाढू लागले आहेत. मालवाहतूकदारांनी डिझेल दरवाढीमुळे आपल्या टनाच्या दरातही वाढ केली.
यापूर्वी ९००-१००० रुपये प्रतिटन दराने मुंबई (वाशी) येथपर्यंत वाहतूक केली जात होती. डिझेल दरवाढीमुळे प्रतिटन आता ११००-१२०० रुपये इतका भाव अटळ आहे, तर पार्सलचे भावही ४ ते ५ टक्क्यांनी वाढले आहेत. ज्या पार्सलला १०० रुपये मोजावे लागत होते, तर त्याच पार्सलला आता ११० रुपये मोजावे लागत आहे.
कुरिअर सेवेतही काहीअंशी वाढ झाली आहे. विशेषत: कोल्हापुरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, आदी ठिकाणी मालवाहतूक केली जाते. यात साखर, कडधान्ये, धान्य, होजिअरी, पानाचे डाग, सजावटीचे साहित्य पाठविले जाते. त्यांच्या भाडेवाढीतही वाढ झाली आहे.
मुख्य परिणाम मुंबई, दिल्ली, नोएडा, बंगलोर, आदी ठिकाणाहून कोल्हापूरच्या बाजारात येणाऱ्या मालवाहतुकीवर झाला आहे. त्याचे दर प्रतिटन १२००-१४०० असे लागू करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत कोल्हापुरातून बाहेरगावी जाणाऱ्या साखरेच्या मालवाहतुकीवर साखरेचा दर पडल्याने परिणाम झाला आहे.
विशेषत: अहमदाबादकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. यासह केरळकडे जाणारी मालवाहतूकही ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवरही झाला आहे.
डिझेलच्या प्रतिलिटर दरात वाढ होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या मालवाहतूकदारांनी दरात वाढ केली नव्हती. डिझेल दरवाढीपूर्वी मालवाहतुकीचे प्रतिटन दर ९००-१००० इतके होते; मात्र, डिझेल दरवाढीनंतर त्यात वाढ करणे अनिवार्य ठरले आहे.- हेमंत डिसले, सचिव, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन