कोल्हापूर : कोल्हापूरातील सर्व चळवळीचे केंद्रस्थान म्हणजे शाहू स्मारक भवन होय. या शाहू स्मारक भवनाचे प्रशासन समर्थपणे चालविणारी व्यक्ती म्हणजे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे होय. हरगुडे यांचा कार्याचा यथोचित सत्कार व्हावा या उद्देशाने कृष्णाजी हरगुडे गौरव ग्रंथ समितीच्यावतीने ऋणानुबंध या गौरवग्रंथाची निर्मिती केली आहे.
या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा शाहू स्मारक भवन येथे १५ जानेवारी रोजी सांयकाळी पाच वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नलगे म्हणाले, गौरवग्रंथामध्ये महाराष्ट्रातील ६५ हून अधिक नामवंतानी हरगुडे यांच्या विषयी आपल्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. या प्रकाश सोहळ््यास जेष्ठ विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.
यासह हरगुडे यांच्या पासष्टीच्या पूर्ती निमित्त त्यांच्या मातोश्रीचे स्मरणार्थ दोन दिवसीय जनाई ग्रंथ महोत्सवाचे शाहू स्मारक भवन येथे आयोजन केले आहे. रविवार दि.१४ व १५ रोजी ग्रंथ महोत्सव होईल. यांचे नियोजन वाचनकट्टा कोल्हापूर व निर्मिती विचारमंच यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, जेष्ठ लेखक डॉ. जी.पी.माळी, पद्माकर कापसे, युवराज कदम, प्रभाकर पाटील आदि उपस्थित होते.