कोल्हापूर : दिवसाला तीन हजार रुपये भाडे देतो, असे सांगून २० लाख रुपये किमतीचे आठ कॅमेरे घेऊन पसार झालेल्या भामट्यावर रविवारी (दि. ४) लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित अमर उदयसिंह साळुंखे (रा. आजरा रोड, गांधीनगर, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, संशयित अमर साळोखे या भामट्याने दिवसाला तीन हजार रुपये भाडे देतो, असे सांगून कोल्हापुरातील दिगंबर प्रकाश टिपुगडे (रा. शनिवार पेठ) यांच्यासह आनंदा खतकर, विनायक चौगले (रा. उत्रे, ता. पन्हाळा) यांचे अडीच लाख रुपये किमतीचे चार व गडहिंग्लज येथून चार असे आठ कॅमेरे नेले.
त्यांतील दोघांना त्याने पन्नास हजार रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र, खात्यावर शिल्लक नसल्याने ते वटले नाहीत. त्याला फोन केला असता फोेन लागू शकला नाही. त्याच्या कदमवाडी येथील पत्त्यावर तो राहत नसल्याचे समजले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच दिगंबर टिपुगडे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भामटा साळोखे याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी सावंत करीत आहेत.