कोल्हापूर : येथील संवेदनशील असलेल्या राजारामपुरी परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचा वावर वाढत आहे. दिवसाढवळ्या नागरिकांची लूटमारी, वर्चस्ववादातून हाणामारी, तलवार, चाकूहल्ले, आदी घटनांनी येथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. राजारामपुरी पोलिसांच्या हाताबाहेर गेलेल्या या गुन्हेगारीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच आवर घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.टोळ्यांच्या वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशाच्या हव्यासापोठी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच राजारामपुरीच्या परिसराला गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे. दुचाकीवरून भरधाव येऊन नागरिकांच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम’ स्टाइलने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत.
राजारामपुरी मेन रोडसह राजेंद्रनगर, जवाहरनगर, विक्रमनगर, सुभाषनगर, मातंग वसाहत, लक्ष्मी कॉलनी, आईचा पुतळा चौक, यादवनगर, दौलतनगर, आदी परिसरांत सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून हाणामारीच्या घटना घडतात.
घराबाहेर पडणारे नागरिक सुरक्षितपणे पुन्हा घरी जातीलच याची हमी या परिसरात नाही. येथील गुन्हेगारी राजारामपुरी पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे. या गुन्हेगारांना चांगलाच चाप बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.