कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनप्रकरणात सीबीआयचे जे दोषारोपपत्र दाखल केले आहे, त्याची कॉपी पेस्ट करुन एसआयटीने गोविंद पानसरे खुनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केल्याची तक्रार वीरेंद्र तावडे याच्या वकिलांनी केली.जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांच्या न्यायालयात वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा यांनी दिलेल्या दोन्ही जबाबात विसंगती असल्याचाही मुद्दा अॅड. समीर पटवर्धन यांनी यावेळी केला. याची पुढील सुनावणी शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.अॅड. समीर पटवर्धन म्हणाले, पानसरे खुन प्रकरणात दुसरा संशयित वीरेंद्र तावडे याला एसआयटीने सप्टेंबर २०१६ ला अटक केली. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा. विनाकारण तावडेला गोवण्यात आले आहे.
याचबरोबर नरेंद्र दाभोलकर प्रकरणात ते आरोपी आहेत. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयचे जसे दोषारोपपत्र (चार्टशिट) होते, तसेच दोषारोपपत्र एसआयटीने पानसरे खुन प्रकरणाचे केले आहे. एकंदरीत,पानसरे चार्टशिट हे कॉपी-पेस्ट केले आहेगोविंद पानसरे नेहमी शिवाजी विद्यापीठ परिसरात मॉर्निंग वॉकला एकटेच जायचे. पण, घटनेच्या अगोदर चार दिवस ते आजारी होते. १६ फेब्रुवारी २०१५ ते त्यांच्या पत्नी उमा हे दोघेजण इडली खाण्यासाठी व आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. ते इडली खाऊन घरी येत होते. त्यांच्यावर हा हल्ला झाला.
पानसरे यांना संशयितांची हत्या करायची असती तर शिवाजी विद्यापीठ परिसरात असलेल्या सुनसान जागेत हत्या केली असती. त्याच्या घराजवळ त्यांच्यावर हल्ला करण्याचे कारण काय, त्यामुळे त्यांच्या हत्येची कोणीतरी ही टीप त्यांच्याच माहितीगार व्यक्तिने दिली असेल असा संशय आहे.
त्या दृष्टिने एसआयटीने तपास करावा.संशयित सारंग अकोळकरांसह इतरांची छायाचित्रे येथे पेस्ट करुन ती साक्षीदारांना दाखविण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी ओळखली असल्याचे दिसते.त्याचबरोबर या प्रकरणातील साक्षीदार उमा पानसरे यांचा मे २०१५ ला पहिला जबाब आणि दुसरा पुरवणी जबाब हा सप्टेंबर २०१६ ला दिला. पहिल्या जबाबात संशयित आरोपींनी पुढून गोळया घातल्या व दोन संशयित होते असे म्हटले आहे तर दुसरा जबाबात त्यांनी पाठिमागून संशयितांनी गोळ्या घातल्या आहेत.त्यामध्ये चार संशयित असल्याचा जबाब दिला आहे.त्यामुळे या दोन्ही जबाबात विसंगती आहेत. या खटल्यातील एक प्रत्यक्षदर्शी अल्पवयीन साक्षीदार व इतरांच्या साक्षीनूसार गोळ्या झाडल्या आहेत असे जबाबात म्हटले आहे.पण,जबाब हा विसंगती वाटतो. त्यांनी चुकीची माहिती दिली आहे. हा सगळा बनाव आहे, तावडे निर्दोष आहे.या प्रकरणात सीबीआयकडे साक्ष देणारे संजय साडविलकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. साक्ष दिल्यानंतर त्यानी याबाबत गोपनियता बाळगली नाही, त्यामुळे साडविलकर यांची साक्ष ग्राह्य धरायची का? हा प्रश्न आहे. साडविलकर याच्या चांदी कारखान्यातील कामगारांच्या जबाबातही विसंगती असल्याचा युक्तिवाद अॅड.पटवर्धन यांनी यावेळी केला.एसआयटीच्या तपास पथकाने समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याच्या सांगलीतील घरात छापा टाकला. तेव्हा सापडलेल्या ‘छात्रधर्म साधना पुस्तक याचा काही संबध नसल्याचे सांगितले. अॅड.पटवर्धन यांना अॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. स्मिता शिंदे यांना सहकार्य केले.सुनावणीसाठी सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे, तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी यांच्यासह मेघा पानसरे, दिलीप पवार, जामिनावरील संशयित आरोपी समीर गायकवाड उपस्थित होते.