चंदगड /कोल्हापूर : ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने ९६ पिलांना जन्म दिला आहे. सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करुन पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे.सेंट्रल झू अँथाँरिटी, दिल्ली व वन्यजीव संरक्षक विभाग महाराष्ट्र राज्य नागपूर यांची मान्यप्राप्त संस्था गेली ४०ते ५० वर्ष सर्प संरक्षण जीवांच्या रक्षणाचे कार्य करीत आहेत. तेथे विविध दुर्मीळ जातीचे साप आहेत. सांपाचे वर्षभर जतन करण्यात येते.
सापांच्या नैसर्गिक कृतींचा अभ्यासही करण्यात येतो. याठिकाणी देशभरातील अभ्यासक भेट देऊन माहिती घेत असतात. सद्यास्थितीत जतन करण्यात आलेल्या विषारी जातीच्या तीन घोणसांनी प्रत्येकी ३० ते ४० अशा एकुण ९६ पिलांना जन्म दिला आहे.
चंदगड वनखात्याचे अधिकारी व सर्पमित्र प्रा.सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत पिलांचा पंचनामा करुन तिलारी जंगलात सोडण्यात येणार आहे. जतन केलेल्या फुरसे, चापडी, मणियार, घोणस या जाती थेट पिलांना जन्म देतात तर नाग, धामण, तस्कर, पानसाप या जाती अंड्याव्दारे पिलांना जन्म देतात असे प्रा. पाटील यांनी सांगितले.