अनिल पाटील
मुरगूड - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात जिद्दीने मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या तरुणाला मृत्यूने गाठले. यमगे ता.कागल येथील स्वनिल सुभाष भाट (वय २६) या तरुणाने जिद्दीने मिळवलेली वर्दी परिधान करण्याअगोदर घेतलेली एक्झिट अख्या गावाला चटका लावून गेली.कुटुंबाला सावरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्वप्नील चा हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब कोलमडले आहे. यमगे येथील स्वप्नील हा आई वडील आणि भाऊ विनायक यांच्यासह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झगडत स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत होता. मोठा भाऊ विनायक हा पोलीस दलात जाण्याचा प्रयत्न करत होता बरेच वर्षे त्याने प्रयत्न केला. त्याने ही प्रचंड कष्ट घेतले होते अनेक वेळा तो भरती होताना अगदी किरकोळ बाबीत बाहेर पडायचा. त्याचे आणि आई वडिलांचे पोलीस होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. नेमक्या याच कारणाने प्रेरित होऊन आपला भाऊ विनायक याचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनाशी बाळगून स्वप्नील ने प्रयत्न सुरू केले होते.
गावाबाहेरील पारख नावाच्या मैदानात तो आपल्या मित्रांच्या सोबत सराव करायचा तसेच रात्र दिवस अभ्यास ही करायचा.सर्व खेळात तो अष्टपैलू खेळ करायचा. विशेषतः क्रिकेट मध्ये तो परिसरात युवा खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता. काही महिन्यांपूर्वी तो मुंबई पोलीस दलामध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये शारीरिक आणि बौद्धिक चाचणी उत्तीर्ण झाला होता. त्याला वर्दी ही दिली होती.एक ऑगस्ट ला तो प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार होता. पण त्या आधीच नियतीने डाव साधला. मंगळवारी संध्याकाळी त्याचा रक्तदाब कमी झाला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि झोपेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.बुधवारी सकाळी त्याच्या वर यमगे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी फोडलेला हंबरडा काळजी पिळवटणार होता. त्याच्या मागे आई वडील भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. यमगेचे पोलीस पाटील किरण भाट यांचा तो चुलत भाऊ होता.