कोल्हापूर : पाचवडे (ता. भुदरगड) येथील आजाराला कंटाळून विष प्राशन केलेल्या तरुणाचा ‘सीपीआर’ रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. महेश बाबूराव रानमाळे (वय २१) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, महेश रानमाळे हा गारगोटी येथील एका शास्त्र शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. वयाच्या १७ व्या वर्षी त्याला रक्ताचा आजार झाला. त्यामुळे त्याची प्रकृती त्याला साथ देत नव्हती. त्याच्यावर मुंबईत चारवेळा रुग्णालयात उपचार झाले; त्यासाठी १२ लाख रुपये खर्च आला.
घरची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांची त्याला बरे करण्यासाठी धडपड सुरू होती. आजारपणाच्या नैराश्येतून महेशने सोमवारी (दि. २९) विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत त्याला ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने आई-वडील आणि भावाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.