कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील क्रशर खणीमध्ये कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सविता आप्पासाहेब निलगिरे (वय २४, रा. शिये क्रशर खणीजवळ), त्यांचा मुलगा सोनू (४) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या मुलाला वाचविताना ही घटना घडली.अधिक माहिती अशी, सविता निलगिरे यांचे मूळ गाव करजगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव आहे. त्या कुटुंबासह या ठिकाणी राहत होत्या. त्यांचा दीर बापू मारुती निलगिरे हा विठ्ठल पाटील यांच्या शिये येथील क्रशरवर मजुरीची कामे करतो. त्याचे दि. १८ जून रोजी लग्न आहे. गांधीनगर येथे लग्नाचा जथ्था काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सविता पती व मुलासोबत शिये येथील दिराच्या घरी आल्या होत्या.
सोमवारी सर्वजण जथ्था काढण्यासाठी जाणार होते. शनिवारी सकाळी त्या मुलगा सोनू याला घेऊन कपडे धुण्यासाठी शेजारीच असलेल्या खणीमध्ये गेल्या. खणीवर अन्य महिलाही धुण्यासाठी आल्या होत्या. सविता धुणे धूत असताना मुलगा सोनू खणीजवळ खेळत होता. तो पाण्यात उतरून आतमध्ये गेला. अचानक खोल पात्रात पडल्याने तो बुडू लागला.
यावेळी खणीवरील महिलांनी आरडाओरड केली. पोटचा गोळा बुडत असल्याचे पाहून सविता त्याला बाहेर काढण्यासाठी पाण्यात गेल्या. त्यांना पोहता येत नसल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या.
खणीवरील आरडाओरडा ऐकून क्रशरवर काम करणारा मजूर बाळकृष्ण आप्पासाहेब सनदी धावत आला. त्याने पाण्यात उडी घेत सोनूला बाहेर काढले. त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात येताच खासगी वाहनातून त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर खणीत बुडालेल्या सविता यांचा मृतदेह बाहेर काढून ‘सीपीआर’च्या शवगृहात आणला. या ठिकाणी पतीसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात झाली आहे.डॉक्टरांनाही गहिवरून आले‘सीपीआर’च्या अपघात विभागात चार वर्षांच्या सोनूला आणले. बेडवर निपचित पडलेल्या सोनूला पाहून डॉक्टर, परिचारिकांसह अन्य रुग्णांच्या नातेवाइकांनाही गहिवरून आले.