कोल्हापूर : राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी या कसदार, कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी ७/१२ वर झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
शुक्रवारी टाऊन हॉल येथे अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम, प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्राचार्य ए. बी. पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुभाष निकम म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाशिक-मुंबई हा महामोर्चा झाला. या मोर्चाने राज्य सरकारला जाग आली. त्यामुळे देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनीबाबत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एप्रिलमध्ये याचा अहवाल देणार आहे.
तरीही, शासनाला एक प्रकारे जाग आणण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला किसान सभेचे जिल्हा कार्यकारिणीचे शिष्टमंडळ भेट देऊन चर्चा करणार आहे.
राज्यातील देवस्थान समितीतील ज्या जमिनी आहेत, त्या कसदार व कुळांच्या नावावर कराव्यात. त्याचबरोबर कसदार व कुळांच्या वारसांच्या नोंदी झाल्या पाहिजेत. बैठकीस अप्पासो परीट, अमोल नाईक, गणेश कुंभार, राजेंद्र आळवेकर, विनायक डंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कोल्हापुरात राज्य मेळावादेवस्थानच्या जमीनप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे आमदार जिवा पांडू गावित, राज्य सेक्रेटरी अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापुरात राज्य मेळावा घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.