कोल्हापूर : दिल्ली येथील भारतीय कुस्ती महासंघाच्या आशियाडसाठी सुरू असलेल्या शिबिरास कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याबद्दल कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने, नंदिनी साळोखेसह फोगट भगिनींचा शिबिरातील सहभागाविषयीचा फैसला महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह हे सोमवारी (दि. २१) घेणार आहेत.लखनौ येथील ‘साई’ सेंटरमध्ये १० मेपासून महिलांचे, तर सोनिपत, बालगड (हरियाणा) येथे पुरुषांचे कुस्ती शिबिर सुरूआहे. यात कोल्हापूरच्या रेश्मा माने हिची ६२ किलोगटात वरिष्ठ गट महिला कुस्तीगीर म्हणून निवड झाली होती.
तिने १४ मे रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या माध्यमातून महासचिव बाळासाहेब लांडगे यांच्या सहीनिशी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांना उद्देशून पत्र लिहिले आहे.
हजर न राहण्याबद्दल परवानगी मिळावी म्हणून हे पत्र दिले आहे. यात हजर न राहण्याबद्दलचे कारणही तिने स्पष्ट केले असून, रविवार (दि. २०) पासून या शिबिरात उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत रेश्माचे वडील अनिल माने यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा निर्णय महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह हे सोमवारी सकाळी होणाऱ्या महासंघाच्या बैठकीत घेतील. त्यानुसार निर्णय आपल्याला कळविण्यात येईल, असे उत्तर दिले. त्यामुळे रेश्मा, नंदिनी साळोखे व फोगट भगिनींसह १३ महिला कुस्तीगीरांचा फैसला सोमवारी होणार आहे.
शिबिरात हजर न राहण्याबाबतची परवानगी आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांच्या पत्राद्वारे भारतीय महासंघाकडे १४ मे रोजी मागितली आहे. ते पत्रही महासंघास मिळाले आहे. याबाबत महासंघाचे सचिव विनोद तोमर यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. या संदर्भात सोमवारी महासंघाची बैठक आहे. त्यानुसार निर्णय होईल व सोमवारी सायंकाळीच रेश्मा लखनौला रवाना होईल.- अनिल माने, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्माचे वडील