कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे दि. २८ जानेवारीला कोल्हापुरात लिंगायत धर्म राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार बुधवारी करण्यात आला.कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्रातर्फे येथील चित्रदुर्ग मठात या महामोर्चाच्या नियोजनासाठी व्यापक बैठक आयोजित केली होती. मात्र, बुधवारी कोल्हापुरात ‘बंद’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ही बैठक रद्द करण्यात आली. तरीही लिंगायत समाजातील शंभराहून अधिक बांधव बैठकीसाठी आले होते. त्यांच्या सूचना महामोर्चाच्या समन्वय समितीने समजून घेतल्या.
याबाबत महामोर्चाच्या निमंत्रक प्रमुख सरलाताई पाटील यांनी सांगितले की, स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा, या मागण्यांसाठी लिंगायत समाजातर्फे काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनासाठीची व्यापक बैठक रविवारी (दि. ७) घेणे. त्यासह लिंगायत समाजातील विविध सर्व पोटजातींतील बांधव-भगिनींना मोठ्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार बुधवारच्या बैठकीत करण्यात आला.
महामोर्चासाठी कोल्हापूर जिल्'ामध्ये जागृती सुरू आहे. त्याची व्यापकता पुढील आठवड्यापासून वाढविण्यात येईल. दि. २८ जानेवारीला सकाळी दहा वाजता दसरा चौकात सभा होणार आहे. येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईल. या ठिकाणी समाजातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
या बैठकीत लक्ष्मण चनगोंडी, आर. बी. पाटील, विनोद नाईकवडी, चंद्रशेखर बटकडली, बाबासाहेब माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तारळी, राजशेखर तंबाके, विलास आंबोळे, अरविंद वडगावकर, सुधीर शहापुरे, पोपट खोत, डॉ. जयकुमार डांग, अण्णासाहेब माळी, आदी उपस्थित होते.