कोल्हापूर : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा मार्केटमध्ये सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात घसरण राहिली. मध्यंतरी दरात थोडी सुधारणा झाली होती; पण आता घाऊक बाजारात साखर ३२ ते ३३ रुपये किलोपर्यंत आहे. अद्याप किरकोळ बाजारातील दर मात्र अद्याप कमी झालेले नाहीत.
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. गेल्या आठवड्यात तूरडाळ व हरभराडाळीच्या दरात थोडी वाढ झाली होती. या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची घट झाली आहे.भाजीपाल्याची स्थानिक आवकही चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. टोमॅटो दहा रुपये किलो तर वांगी, दोडका, ओला वाटाणा, कारली ४० रुपये किलो दर आहे. मेथी, पोकळ्याची पेंढी पाच रुपये तर कोथंबीरचे दर स्थिर आहेत. काकडीची आवकही वाढली असून कोवळी काकडी ६० रुपये किलो. फळ मार्केटमध्ये सध्या कलिंगडे, द्राक्षांची आवक जोरात आहे.
तमिळनाडू येथून हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे. त्याचबरोबर यंदा स्थानिक शेतकऱ्यांकडूनही आवक चांगली असल्याने ऐन हंगामात दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात २० ते ४० रुपयांपर्यंत दर आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने लिंबूची मागणीही वाढली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू मिळत असून डाळींब सोडले तर सर्वच फळे शंभर रुपये किलोच्या आत मिळत आहेत.मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. सध्या आवक सुरू असली तरी यंदा थोडा उशिराच नियमित आवक सुरू होईल. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याचा दर तेजीत आहे. सरासरी तीन हजार रुपये पेटी तर साडेसातशे रुपये बॉक्सचा दर आहे.
साखरेच्या माळांनी बाजार फुललेयेत्या रविवारी गुढी पाडवा असल्याने बाजारात साखरेच्या माळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. रंगीबेरंगी माळांनी दुकाने फुलली आहेत.
ब्याडगी यंदा झटका देणारयंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने अपेक्षित आवक नाही. परिणामी सध्या बाजारात दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ब्याडगी १६० तर जवारी १४० रुपये किलो दर राहिल्याने यंदा ग्राहकांना मिरची झटका देणार हे नक्की आहे.