कोल्हापूर : श्रावण सुरू झाल्याने बाजारात शाबू, वरी, शेंगदाणासह फळांना आणि विशेषत: खजुर या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र; भाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर घसरली आहे. कोथिंबिरीची पेंढी पाच रुपयाला झाली आहे; पण हिरवा वाटाण्याची आवक कमी झाल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. तो प्रतिकिलो ८० रुपयांवरून तो ९० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे ग्राहकांची गर्दी कमी होती.रविवारपासून श्रावण सुरू झाला. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने शाबू, वरी, बटाटा, राजगिरा व राजगिरा लाडू, खजूर खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. शाबूचा प्रतिकिलो दर ६४ रुपये, वरी ७२ रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत, शेंगदाणे ८० ते ९०, खजूर १00 रुपये ते १२० रुपये आणि राजगिरा लाडू पॅकेट २० रुपये, राजगिरा ८० ते ९० रुपये असा होता. याचबरोबर बटाटालाही मागणी वाढली आहे; मात्र त्याचे दर स्थिर आहेत.
बटाटा २० रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत आहेत. साखर ३६ ते ३८ रुपये, सरकी तेल ९०, शेंगतेल १२५ रुपये तर सुके खोबरे २२० रुपये प्रतिकिलो झाले आहे. यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. याचबरोबर फळांना मागणी वाढली आहे. मोसंबी, डाळिंब, सीताफळ, केळी व तोतापुरीसाठी ग्राहकांची गर्दी होती; पण दरात वाढ झाली आहे. सीताफळाचा ढिग ४०० रुपये होता.गेल्या आठवड्यात असलेल्या फळभाज्या आणि पालेभाज्या यांचे दर या आठवड्यातही स्थिर आहेत; परंतु, कोबीमध्ये वाढ झाली असून गड्डा १0 रुपये झाला आहे. तसेच मेथी, पालक स्वस्त झाला. मेथीची पेंढी पाच रुपये तर पालक सहा रुपये होता.
यांचे दर स्थिर...वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बु मिरची, घेवडा, गवार, भेंडी, वरणा, दोडका, काकडी, वाल, बिनीस, दुधी भोपळा, फ्लॉवर, पडवळ, मुळा, शेवगा शेंग, बीट, कांदा पात, तोंदली, पोकळा.
कांदा वाढला...कांदा हा सर्व प्रकारच्या जेवणात वापरला जातो; पण या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. तो १२ रुपये प्रतिकिलो जाऊन पोहोचला आहे.
श्रावणात विशेषत: पांढरे फूल आणि बेलाला मागणी जास्त असते. यंदा १0 रुपयाला बेलाची पेंढी आहे; पण फुलांचे दर सध्यातरी स्थिर आहेत.- किरण गायकवाड, विक्रेते गायकवाड ब्रदर्स मर्चंट, कोल्हापूर.