कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट क्रमांक ९२५/८अ १ या सरकारी हक्कातील ७ हेक्टर जमिनीचे भूखंड पाडून, ती बेघर कुटुंबांना रहिवासी वापरासाठी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी बेघर कुटुंबांनी राणी इंदुमतीदेवी बेघर संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी निदर्शने करून घोषणाबाजीही करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास बेघर कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. सरकारी हक्कातील जमीन रहिवासी वापरासाठी द्यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत, धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये महिलांसह कुटुंबीयांचाही समावेश होता. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रदेश सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.यानंतर संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरकुले मिळावीत, अन्न सुरक्षा योजनेतून लाभार्थ्यांना अनुदानाऐवजी धान्यच मिळावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.आंदोलनात दिलीप शिंगाडे, उदय कंगणे, हिरालाल कांबळे, यशवंत सरोदे, अशोक बरगे, रवींद्र कांबळे, रघुनाथ कोळी, वैशाली कंगणे, कविता साळुंखे, कल्पना लोहार, आदींचा समावेश होता.