कोल्हापूर : ‘आरटीओ’ कार्यालयातील अधिकारी किरकोळ कारणांवरून रिक्षा पासिंग नाकारत आहेत; त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांना सूचना देऊन नियमित पासिंग करावे. यासह अन्य मागणीकरिता शुक्रवारी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने ‘आरटीओ’ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर-ए-रिक्षा, काळी पिवळी टॅक्सीचे थांबे, नवे थांबे निर्माण करावेत. गॅसकीट रिन्यूव्हलची कोल्हापुरात सोय करावी. रिक्षा व टॅक्सी चालकांकरिता कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. शासन नियमाप्रमाणे बॅज त्वरित उपलब्ध करून द्यावेत.
विम्याचे दर पूर्ववत करावेत. बोगस कागदपत्रे बनवून परमीट चढविल्याचे सांगत अधिकारी पुन्हा परवाना देण्यास नकार देत आहेत. यासह नियमित रिक्षांचे पासिंग करताना किरकोळ कारणे सांगून रिक्षाचालकांना पुन्हा उद्या पासिंगला या, असे सांगत आहेत; त्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे; त्यामुळे पासिंग त्वरित पूर्ववत करावे. या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सर्व रिक्षाचालकांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार निदर्शने केली.यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजू जाधव, दिनेश परमार, दिलीप सूर्यवंशी, भारत चव्हाण, योगेश रेळेकर, धनाजी यादव, विजय जेधे, राजू मुल्लाणी, सुभाष शेटे, ईश्वर चणी, मोहन बागडी, अरुण घोरपडे, सरफुद्दीन शेख, दीपक पोवार, सुधाकर शेलार, विनायक पत्रावळे, आदी उपस्थित होते.