तानाजी पोवार
कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करत बसलेल्या पोलीसांना हटविणाऱ्या शहर पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह सोबतच्या दोन पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याबाबत दोघांसह पोलिसांसह एकूण तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उगारण्याचे धाडस पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्रीच्या वेळी जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. त्याच पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ओपन बार, अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण हे दोन कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. त्यावेळी कसबा बावडा येथील शंभर फुटी रोड परिसरात उघड्यावर महामार्ग विभागाच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यासह एकुण तिघेजण मद्यप्राशन करून दंगामस्ती करत होते. त्यावेळी शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, अंगरक्षक प्रविण पाटील यांनी त्यांना हटकले. मद्यधंद अवस्थेतील महामार्ग च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उप अधीक्षक चव्हाण व पोलस कर्मचारी पाटील यांच्याशी वादावादी केली, वाद वाढत गेला. महामार्गच्या मद्यधंद पोलिसांनी उप अधीक्षक चव्हाण व पाटील यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. संबधीत घडलेला प्रकार चव्हाण यांनी रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या कानावर घालला. त्यानुसार अधीक्षक बलकवडे यांनी संबधीत महामार्गच्या पोलिंसांसह एकुण तिघांवर कारवाई च्या सुचना दिल्या. त्यानुसार उप अधीक्षक चव्हाण यांचे अंगरक्षक प्रविण प्रल्हाद पाटील याने दिलेल्या तक्रारीनुसार महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील (वय ५१ रा. पोलीस मुख्यालय, कोल्हापूर), राजकुमार शंकर साळुंखे (वय ५३ रा. बेडेकर प्लाझा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई (वय ३६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) यांच्यावर रविवारी सकाळी महाराष्ट्र दारू अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
कारवाई करताना दुजाभाव
दरम्यान, अशा पध्दतीने धक्काबुक्की करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर सरकारी कामात अडथळा गुन्हा नोंदवला जातो, पण मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच ड्युटी बजावणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलूनही त्यांच्यावर कारवाई करताना फक्त दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई केल्याने नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हात उगारण्याचे धाडस पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याने हा जिल्ह्याभर चर्चेचा विषय बनला आहे.