कोल्हापूर : प्रांतवाद, अस्पृश्यता, जातीयवाद, भेदभाव, भ्रष्टाचार, दहशतवाद या नव्या काळातील राक्षसी प्रवृत्ती आहेत. समाज बिघडविणाऱ्या या प्रवृत्तींचा नाश संघटनेच्या जोरावरच करा, असे आवाहन पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे न्यू कॉलेजच्या पटांगणावर आयोजित राजर्षी दसरा उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.जयंतीभाई भडेसिया म्हणाले, संघाने आता हाती घेतलेल्या सामाजिक समरसतेचे प्रणेते शाहू महाराजच आहेत. त्यांच्यामुळेच ब्राह्मणेत्तर वैदिक चळवळीला बळ मिळाले. वंचित घटकांना आरक्षणासह शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. म्हणूनच त्यांच्या कर्मभूमीत त्यांच्याच नावाने संघाचा दसरा महोत्सव साजरा करताना विशेष आनंद होत आहे. त्यांनी अस्पृश्यतेविरोधात चळवळ सुरू केली.
शाहू, फुले, आंबेडकरांनी समतेवर आधारित समाजाचे स्वप्न पाहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते पूर्ण करण्यास सदैव तयार आहे. गावात स्मशानभूमी, पाणवठा, विहीर ही एकच असावी, असे आपले धोरण आहे. तरीही अजूनही भेदभाव केला जात असल्याचे पाहून राक्षसी प्रवृत्ती जिवंत असल्याचे दिसते. ती संपविण्यासाठी संघटितपणे लढा देण्याची गरज आहे.कार्यक्रमाची सुरुवात शस्त्र व प्रतिमापूजनाने झाली. ध्वजारोहण झाल्यानंतर प्रार्थना म्हणून स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर करीत सांघिक गीत गाइले. विवेक मंद्रूपकर यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. यावेळी डॉ. सूर्यकिरण वाघ, भगतराम छाबडा यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी दसऱ्याला होणारे संचलन खराडे हायस्कूल येथून सकाळी सव्वासात वाजता सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
हिंदकेसरी पैलवान दीनानाथसिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकत नसल्याचे सभास्थळी जाहीर करण्यात आले. त्यांनी पाठविलेले मनोगत वाचून दाखविण्यात आले. यात त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करून कोल्हापूरकरांनी दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.