- सचिन भोसले कोल्हापूर - ऐतिहासिक दसरा चौकामध्ये गेली ५७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सुरू असलेले सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय समन्वयाकांतर्फे रविवारी घेण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीच्या आंदोलनात मोठया ताकदीने व हजारोंच्या सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी गावागावातील समाज बांधवाशी संपर्क साधून प्रबोधन केली जाणार आहे.
वसंतराव मुळीक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने २० जानेवारी २०२४ होणाऱ्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी जिल्हयातील समाज बांधवांमध्ये जाउन त्या विषयी जनजागृती करण्यात येईल. मराठयांना जरांगे पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकदीने राहू.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, क्युरेटिव्ह पिटिशनबाबत शासनाकडून फसवणूक सुरू आहे. त्याबाबत आपली दिशाभूल केली जात आहे. आताची लढाई जिंकली नाही, तर पुन्हा असा लढा देणे शक्य होणार नाही. रस्त्यावरील लढाई बरोबरच कायदेशीर लढा ही दयायला हवा.
विजय देवणे म्हणाले, जिल्ह्यात मुंबईतील आंदोलनाबाबात जनजागृती करूया. किमान १० हजार समाज बांधव मुंबईतील आंदोलजात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करूया. यावेळी ॲड. सुरेश कुराडे, सुभाष जाधव, उदय लाड, चंद्रकांत पाटील, श शिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा पाठींबासंजयबाबा घाटगे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठींबा व्यक्त केला. तर हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी तालीम संघातर्फे या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला. तसेच गेल्या ५७ दिवसांत पाठींबा दिलेल्या सर्व घटकांचे आभार समन्वयकांतर्फे मानण्यात आले.