कोल्हापूर : जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नव्याने दाखल झालेल्या सहा बोटींची मंगळवारी राजाराम तलावात यशस्वी चाचणी घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुमारे पाच तास प्रात्यक्षिके घेण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत सकाळी साडे आठच्या सुमारास प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.
यामध्ये बोटी व्यवस्थित चालतात का?, त्यांच्यामध्ये काही बिघाड झाला आहे का?, त्या सुस्थितीत आहेत का? याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये नवीन सहाही बोटी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. या चाचणीवेळी जीवन ज्योत सामाजिक संस्था, ‘पास’ रेस्क्यू फोर्स यांचे स्वयंसेवक उपस्थित होते.जिल्ह्यात सध्या शिरोळ, हातकणंगलेसह पुराच्या ठिकाणी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडे दाखल झालेल्या नवीन बोटी आवश्यक असणाऱ्या तालुक्यात दिल्या जाणार आहेत.