कोल्हापूर : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा फाळा महापारेषण कंपनीने थकवला आहे. या विषयावरुन सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये जोरदार चर्चा झाली. भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारण्यात येणार असलेल्या व्यापारी संकुलाबाबतचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.तळंदगे येथे ४00 केव्ही विद्युत ग्रहण केंद्र आहे. येथील केंद्रासाठी वापरलेली जमीन आणि इमारतीच्या फाळ्याची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची रक्कम महापारेषणने अजूनही अदा केलेली नाही; त्यामुळे ग्रामपंचायतीने १आॅगस्टला टाळे ठोकले आहे.
यावरून हा विषय स्थायी सभेत चर्चेला आला. याआधी हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांसमोरही सुनावणी झाली. त्यामध्ये महापारेषणने ही रक्कम ग्रामपंचायतीकडे भरावी असे निर्देश दिले.
मात्र स्थायी समितीतील चर्चेवेळी महापारेषणच्या वकिलांनी अशा पद्धतीने सुनावणी घेण्याचा अधिकारच गटविकास अधिकाऱ्यांना नसल्याचा मुद्दा मांडला. यावेळी मात्र सदस्य राहुल आवाडे यांनी आक्षेप घेतला.
गटविकास अधिकाऱ्यानी नोटीस काढल्या, तुम्ही उपस्थित राहिलात, बाजू मांडलात. मग त्याचवेळी अधिकार नाही, हे का नाही सांगितला असा सवाल आवाडे यांनी उपस्थित केला. यावर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी याबाबत दोन दिवसांमध्ये स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या.
भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या जागेवरील सध्याची जीर्ण इमारत आणि गाळे पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन आहे. याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विविध इमारतींच्या निर्लेखनासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश घाटगे, वंदना मगदूम, विशांत महापूरे यांच्यासह समितीचे सदस्य, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास व विभागप्रमुख उपस्थित होते.